Shree-Mahalakshmi
श्रीमहालक्ष्मीची आरती

जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी
वससी व्यापकरुपे तू स्थुलसुक्ष्मी ॥धृ.॥

करवीरपुरवासिनी सुरवरमुनि-माता
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता
कमलाकरे जठरी जन्मविला धाता
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥१॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥२॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री निजबीजा निगमागम सारी
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥

अमृत-भरिते सरिते अघदुरितें वारीं
मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं
वारी मायापटल प्रणमत परिवारी
हे रुप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥४॥

चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी
लिहिल्या असतील माते माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥५॥

------------------------------------------------------------------

श्री नवरात्र आरती

अश्विन शुद्ध शुक्लपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो ।
प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र जप करुनी भोंवते रक्षक ठेवूनी हो ।
ब्रह्माविष्णू रुद्र आ‌ईचे करीती पूजन् हो ॥१॥

उदो बोला उदो अंबाबा‌ई मा‌ऊलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥धृ.॥

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगीनी हो ।
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।
उदोकारे गर्जती सकल चामुंडा मिळोनी हो ॥२॥

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो ।
मळवट, पातळ-चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥३॥

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो ।
उपासका पहासी प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपे पहासी जगन्माते मनमोहिनी हो ।
भक्तांच्या मा‌ऊली सूर ते येती लोटांगणी हो ॥४॥

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो ।
आर्धपाद्य पुजनें तुजला भवानी स्तविती हो
रात्रीचे समयी करिती जागरण हरी कथा हो ।
आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रिडता हो ॥५॥

षष्ठीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो ।
घेवुनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो ।
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥६॥

सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो ।
तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो
जा‌ईजु‌ई शेवंती पूजा रेखीयली बरवी हो ।
भक्त संकटी पडता झेलुनी घेसी वरचे वरी हो ॥७॥

अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो ।
सह्याद्री पर्वती उभी पाहिली जगज्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो ।
स्तनपान दे‌ऊनी सुखी केले अंत:करणी हो ॥८॥

नवमीचे दिवशी नवदिवसांचे पारणे हो ।
सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो
षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो ।
आचार्य ब्राह्मणा तृप्त त्वा केले कृपे करुनी हो ॥९॥

दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो ।
सिंहारूढे दारुण शस्त्रें अंबे त्वा घेउनी हो ॥
शुंभनिशूंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो ।
विप्ररामदासा आश्रय दिधला चरणी हो ॥१०॥

------------------------------------------------------------------

श्रीमहालक्ष्मीची आरती - जय देवी विष्णुकांते

जय देवी विष्णुकांते । महालक्ष्मी ग माते ।
आरती ओंवाळीन तुज विज्ञानसरिते ॥धृ.॥

मर्दिला कोल्हासुर । ख्याती केली की थोर ॥
श्रीलक्ष्मी नाम तुझें ।दैत्य कांपती फार ॥१॥

धन्य तेथीचे नर । सकळही मुक्त होती ॥
तुजला पहातां सत्वर ॥२॥

रहिवास कोल्हापूरी । पंचगंगेच्या तीरी ॥
सुविशाळ सिंहासन ।विराजसी तयावरी ॥३॥

मागणें हेंचि माये ।आतां दाखवी पाये ॥
उशीर नको लावू ।दास तुझा वाट पाहे ॥४॥

------------------------------------------------------------------


सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने ।
गजगमने सुरनमने कोल्हापुरमथने ।
सुरवर वर्षति सुमनें करुनियां नमनें ।
भयहरणे सुखकरणे सुंदरी शिवरमणे ॥१॥

जय देवी जय देवी वो जय अंबे ।
कोल्हापुराधिस्वामिणि तुज वो जगदंबे ॥धृ.॥

मृगमदमिश्रित केशर शोभत तें भाळीं ।
कुंचित केश विराजित मुगुटांतून भाळीं ।
रत्नजडित सुंदर अंगी कांचोळी ।
चिद्‌गगनाचा गाभा अंबा वेल्हाळी ॥२॥

कंठी विलसत सगुण मुक्ता सुविशेषें ।
पीतांबर सुंदर कसियेला कांसे ।
कटितटि कांची किंकिणि ध्वनि मंजुळ भासे ।
पदकमळलावण्यें अंबा शोभतसे ॥३॥

झळझळ झळझळ झळकति तानवडें कर्णी ।
तेजा लोपुनि गेले रविशशि निज करणीं ।
ब्रह्महरिहर सकळिक नेणति तव करणी ।
अद्‌भुत लीला लिहितां न पुरे ही धरणी ॥४॥

अष्टहि भूजा सुंदर शोभतसे शोभे ।
झगझग झगझग झगति लावण्यगाभा ।
म्हगम्हग म्हगम्हग म्हगीत समनांची शोभा ।
त्र्यंबक मधुकर होउनि वर्णितसे अंबा ॥५॥