Mantra Pushpanjali
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या: सन्ति देवाः ॥१॥ [संदर्भ: ऋग्वेद १०.९०.१६]

ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान्कामकामाय मह्यम् कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॥२॥ [संदर्भ: तैत्तिरीय उपनिषद ४.४.२]

ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समन्तपर्यायीस्यात्सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति ॥३॥ [संदर्भ:अथर्ववेद १९.१५.२]

तदप्येषः श्लोकोऽभिगीतोः मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेः विश्वेदेवाः सभासद इति ॥४॥ [संदर्भ:अथर्ववेद १०.८.९]

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी अर्थ:

मंत्र पुष्पांजली हा एक महत्त्वाचा श्लोक आहे जो प्रामुख्याने हिंदू पूजेच्या शेवटच्या टप्प्यात म्हटला जातो. यामध्ये वैदिक मंत्रांचा समावेश असून, हे मंत्र परमेश्वराची स्तुती करतात आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी केलेले भक्तांचे एक श्रद्धायुक्त आवाहन असते. मंत्र पुष्पांजलीची सुरुवात 'ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त' पासून होते. यज्ञ म्हणजे देवाला प्रसन्न करण्यासाठी, विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी, किंवा पवित्र कार्याच्या पूर्ततेसाठी अग्निमध्ये हविर्दान (तूप, धान्य, फळं इत्यादींची आहुती) देण्याची एक पवित्र कर्मकांडीय प्रक्रिया. यज्ञाचा दुसरा अर्थ त्यागाशी संबंधित आहे. यज्ञामध्ये स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून समाजाच्या किंवा धर्माच्या हितासाठी केलेले कार्य समाविष्ट असते. यज्ञ हा एक संस्कार म्हणूनही पाहिला जातो, जिथे शुद्धता, पावित्र्य आणि धर्माचे पालन करण्यावर भर दिला जातो. इंद्रियांद्वारे होणारी सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करणे यालाच यज्ञ म्हणतात.

देवांनी यज्ञाचे अनुष्ठान केले आणि त्याद्वारे "धर्माणि प्रथमान्यासन्" म्हणजे वैदिक धर्माचे नैतिक आणि सांस्कृतिक नियम प्रस्थापित करून धर्माची स्थापना केली. या श्लोकात "यज्ञ" हे केवळ एक धार्मिक विधी नसून एक व्यापक संकल्पना म्हणून मांडले आहे, ज्याद्वारे विश्वाच्या नियमांची स्थापना झाली आहे. यज्ञाच्या माध्यमातून भक्त देवांना आहुती देतात आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या शक्तीने (आपल्या यज्ञीय कर्मांनी महिमान्वित) होऊन स्वर्गात पोहोचतात, जिथे पूर्वीच्या काळातील साध्य (सिद्ध पुरुष) आणि देवता वास करतात. ॥१॥

विश्रवणाचा पुत्र म्हणजेच वैश्रवण कुबेर. जो कुबेर दैवी संपत्तीच्या भांडाराचा प्रमुख आहे. जो बलपूर्वक शत्रूंना पराजित करतो, अशा शक्तिशाली राजा कुबेराला आम्ही नमस्कार करतो. कुबेर, जो कामनांचा राजा आहे, त्याने माझ्या सर्व इच्छांची पूर्तता करावी. कुबेर, जो वैश्रवण म्हणून ओळखला जातो, त्याला महाराजा म्हणून नमस्कार. इथे कुबेराला प्रसन्न करून आम्हाला दैवी संपत्ती प्राप्त करता येईल ज्यामुळे इहलोक प्राप्त होईल अशी अपेक्षा करून कुबेराला नमस्कर केले आहे. ॥२॥

हे आमचे कल्याणकारी, श्रेष्ठ, सर्वोच्च अधिकाराने आणि पूर्ण स्वायत्ततेने युक्त असे साम्राज्य अनंत काळापर्यंत राहावे आणि पृथीवर सर्वत्र समुद्रापर्यंत प्रस्थापित व्हावे म्ह्णून प्रार्थना केली आहे. इथे साम्राज्याचा दुसरा अर्थ आमचे जीवन हा घेतलेला आहे. हे विश्व पंचतत्वांपासून निर्माण झाले आहे. इथे "पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया" चा अर्थ पृथ्वी तत्व म्हणजे स्थिरता व दृढता आणि समुद्र (पाणी) म्हणजे प्रवाहीपणा आणि लवचिकता. म्हणजेच आमचा जीवनात स्थिरता, दृढता, प्रवाहीपणा आणि लवचिकता ह्यांचे योग्य मिश्रण असावे. तसेच पृथ्वी तत्व (माती) म्हणजे खनिजे आणि समुद्र( पाणी) जे जीवन फुलविण्यास आवश्यक असते यांवर आमचे नियंत्रण असावे म्हणजे ह्या दोनही घटकांचा नियंत्रित उपयोग करून त्याचा समाजाच्या कल्याणासाठी वापर करीत येईल. थोडक्यात स्वतःचे मन अथवा समाज मन यात आवश्यक तेवढी दृढता असावी, योग्य प्रमाणात स्थिरता आणि गतिशीलता असावी आणि आवश्यक तेवढी नम्रता असावी याबद्दल प्रार्थना केली आहे. ॥३॥

मरुतगणांनी मरुत्त राजाच्या घरी निवास केला, आणि त्या घराचे रक्षण केले. मरुतगणांची उपस्थिती हा शक्ती, सामर्थ्य आणि संरक्षणाचा प्रतिक आहे. मरुत म्हणजे वायू. मनाचे अस्तित्व वायूसारखे असते थोडक्यात ते चंचल असते. त्याला योग्य रीतींनी बंध घातला तर जीवन सफल होते. दुसऱ्या अर्थाने इथे योग्य नियम घालून निर्माण केलेला समाज हा आहे आणि अशा समाजाचे सभासदत्व आपल्याला मिळो अशी कामना आम्ही विश्वदेवांकडे करितो आहे म्हणू हा श्लोक इथं गायिला आहे. तसेच इथे आपले राज्य म्हणजे पृथ्वी जी वायूंनी परिवेष्टीत आहे थोडक्यात अंतराळातील गोष्टीपासून वायू आपले संरक्षण करतात व मेघांचे, पराग कणांचे वहन करून ते जीवन फुलवितात म्हणून ते तसेच परिवेष्टीत राहो म्हणून ही प्रार्थना. ॥४॥

राजांचा राजा, म्हणजे सर्व राजांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या, अत्यंत बलशाली आणि असाधारण शक्ती अशा वैश्रवण, म्हणजे कुबेर यांना आदरपूर्वक नमस्कार करतो. माझ्या सर्व इच्छांना पूर्ण करणाऱ्या कामेश्वरा, कृपया मला माझ्या वरील इच्छापूर्तीसाठी आशीर्वाद द्या. ॥५॥