Shree Ram
श्री रामाची आरती

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह अहंभाव रावण निवटोनी ॥१॥

जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ॥धृ.॥

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ।
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला ।
आनंदाची गुढी घेऊनिया आला ॥२॥

निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता ।
आरती घेऊनी आली कौसल्यामाता ॥३॥

अनाहतध्वनि गर्जती अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरीं होत आहे आनंद थोर ॥४॥

सहजसिंहासनी राजा रघुवीर ।
सोऽहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदास स्वामी आठव ना विसर ॥५॥