॥ श्री शंकराची आरती ॥
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ॥१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥धृ.॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥३॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥४॥