Shree Pandurang/ Viththal
श्री विठोबाची आरती

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा |
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा |
पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा |
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥

जय देव जय देव पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा ॥धृ॥

तुळसीमाळा गळां कर ठेवुनी कटी |
कसे पितांबर कस्तुरी लल्लाटी |
देव सुरवर नित्य येती भेटी |
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ॥२॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा |
सुवर्णाची कमळे वनमाळा गळां |
राई रखुमाबाई राणीया सकळा |
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥

ओवाळूं आरत्या कुर्वंड्या येती |
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती |
दिंड्या पताका वैष्णव नाचती |
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती
केशवासी नामदेव भावें ओवाळिती ॥५॥

------------------------------------------------------------------

श्री पांडुरंगाची आरती

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥

पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ २ ॥

विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ ३ ॥

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ॥ ४ ॥