shree Datt
श्री दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ता हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेती नेती शब्द नये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।
आरती ओवाळीतां हरिली भवचिंता ॥धृ॥

सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त ।
अभ्याग्याशी कैंची कळेल हि मात ।
पराही परतली तेथें कैचा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥२॥

दत्त येउनिया उभा ठाकला ।
सद्भावें साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्ना होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपलें मन झालें उन्मन ।
मीतुं पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥४॥

------------------------------------------------------------------

श्री गुरू दत्तराज मूर्ती

श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती ॥धृ॥

ब्रम्हा विष्णू शंकराचा, असे अवतार श्री गुरुचा
कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्रीऋषीचा
धरीला वेष असे यतीचा, मस्तकी मुगुट शोभे जटेचा
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी, हातामधे आयुधे बहुत वरूनी,
तेणे भक्तांचे क्लेश हरूनी, त्यासी करूनी नमन
अघशमन होईल रिपुदमन, गमन असे त्रिलोक्यावरती॥१॥

गाणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेसी
भीमा अमर संगमासी भक्ती असे बहूत सुशिष्यांची
वाट दावूनीया योगाची ठेव देत असे निज मुक्तीची
काशी क्षेत्री स्नान करितो करविरी भिक्षेला जातो
माहुरी निद्रेला वरीतो तरतरीत छाती, भरजरित
नेत्र, गरगरित शोभतो त्रिशुळ जया हाती ॥२॥

अवधुत स्वामी सुखानंदा ओवाळीतो सौख्यकंदा
तारी हा दास रुदनकंदा सोडवी विषय मोहछंदा
आलो शरण अत्रीनंदा दावी सद्गुरु ब्रह्मानंदा
चुकवी चौऱ्यांशीचा फेरा घालीती षडरिपू मज घेरा
गांजीती पुत्र पौत्र दारा वदवी भजन मुखी, तव
पूजन करीत असे सुजन तयांचे या दासावरती ॥३॥