Shree Devi Saptshrungi Stotra
▶ Watch on YouTube
श्रीगणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्ये नमः ॥
श्री गुरुभ्यो नमः ॥ श्री दुर्गादेव्ये नमः ॥


ॐ नमो श्री सप्तशृंगी निवासिनी | नमो सह्याद्रीशिखर रूपिनी |
नमो त्रिगुणरूप विश्वमोहिनी | जगजननी तुज नमो ॥१॥

नमो महिषासुरमर्दिनी | नमो सुरवरबंधमोचनी |
नमो भक्त मनोल्हासिनी दैत्यकुलदाहिनी तुज नमो ॥२॥

नमो मुळमाया भगवती | तुझीया नामे भक्त गर्जती |
सगुणरूप नटली पर्वती | पहाता तटस्थ सूरनर ॥३॥

कष्टे लंघुनी गिरीवर | जवळ करिता तुझे द्वार |
शिन भाग उतरे पार |नवल अदभूत हेची पै ॥४॥

सुंदर ध्यान मृत्युलोकी | भक्तलिन सदविवेकी |
साष्टांग नमोनी नयन झाकी | हृदय मंदिरी रूप तुझे ॥५॥

सर्व सुरांचे तेज एकवटले | आष्टादश भूजारूप नटले |
दानवा अंगी भय सुटले | उर्वीवरी प्रगटता ॥६॥

सर्व देवांची एकशक्ती | प्रेमभावे करावी भक्ती |
ओळंगती चारी मुक्ती |निश्चय चित्ती असावा ॥७॥

औट पिठे भारता माझारी | अर्धपिठ सप्तश्रुंगगिरी |
दुर्गा हीच आष्टादशकरी | पावली निर्वाण भक्तासी ॥८॥

विप्रकुळांची कुलस्वामिनी | रेणुकामाता पुरनिवासिनी |
क्षत्रियकुल वरदायिनी | तुळजापूर तुकाई ॥९॥

तृतीय वर्ण वैश्याची आई | करविर निवासिनी रमाबाई |
शूद्रादि चारी वर्णा ठायी सप्तशृंग दुर्गा कृपाळू ॥१०॥

ध्यान धावते पर्वत कंदरी | क्रोधावली असुरावरी |
नानापरी आयुधेकारी | रणांगणी उभी जैसी ॥११॥

कधी सौम्यरूप दिसे | कधी नयना उग्रता भासे |
भक्तजना लाविले पिसे | संचारोनी नाचवी थै थै ॥१२॥

सन्मुख पर्वती मार्कंडेय मुनी | वदे सप्तसतीचा मधुर ध्वनी |
परिसे जगदंबा लक्ष लावोनी | हस्त कर्णासी लाविला ॥१३॥

घोडंब निवासीनि धृवबाला | स्तवनार्थी उभी पूर्वेला |
पाठीशी परशुरामबाला | निसर्ग रचना सुंदर ॥१४॥

गणेशतीर्थी लंबोदर | यमुनातांबुल तीर्थ मनोहर |
शिवालय तीर्थी सिद्धेश्वर | स्नाने पतिता उद्धरी ॥१५॥

पिंडश्राद्ध पितृतर्पण | करिता पूर्वजा उद्धरण |
मणिद्वीपी स्वानंदे करून | समीपता मुक्ती भोगिती ॥१६॥

नवदुर्गा पर्वत शिखरी | शस्त्रे सज्ज घेवुनिया करी |
गुप्तउभ्यारण सुंदरी | ध्वजरक्षणी सावध ॥१७॥

सप्तमातृका विक्राळरूप | करी पाजाळुनी पोत दीप |
स्वेच्छे खेळती समीप | रक्षणी सप्तश्रुंगाचे ॥१८॥

वेताळादि चंडीका भैरव | शाखिनी डाकिनी बिरुदेव |
सांभाळी ती स्वयमेव | अंबिका राजदरबार ॥१९॥

अदभूत चमत्कार अनेक | वर्णिता वाटेल कौतुक |
सर्वस्वी नटली रूप एक | भगवती अंबिका समर्थ ॥२०॥

राम असता बाल ब्रह्मचारी | तीर्थे फिरलासे उर्वीवरी |
तव सप्तश्रुंगासी रावणारी | दर्शनास्तव पातले ॥२१॥

रघुनाथ वनवासी असता | पंचवटी ये निवास करिता |
संगे घेउनी जनकदुहिता | मातेच्या दर्शनी येतसे ॥२२॥

अद्यापि सिंदूर चर्चुनी | जगदंबे सन्मुख बैसोनी |
भक्तजना प्रथम दर्शनी | सगुणरूप नटला असे ॥२३॥

ऐसी माय माझी अनादी | सदभक्ता उतरावी भवाद्धी |
योगिया ब्रह्मानंदपदी | स्वानंदे बैसवी अक्षय ॥२४॥

सप्तश्रुंगरूपे सप्तशती | शुद्ध वैखरी उच्चारिती |
तयासीच उत्तमगती | तवकृपे लाभतसे ॥२५॥

ऐसी जगन्माता श्रीमंतीण | भक्ता का करिसी हैराण |
अन्न उदकास्तव दिनदिन | हिंडवीसी दारोदारी ॥२६॥

भक्ता कसोटी लाविसी | खरे खोटे निवडिसी |
सदभक्ता अपंगीसी | अंती दाविसी ब्रह्मरूप ॥२७॥

तुझे गाता गुणगान | राधासुत झाला लीन |
जळी स्थळी तुझे ध्यान | अहोरात्र ध्यातसे ॥२८॥

कधी दाविसी चितस्वरूप | भक्ती करिता जपतप |
अंतरीचा ध्यान दिप | अखंड जळतो तवकृपे ॥२९॥

आता नको हो अंत पाहू | करपल्लवे किती तुज पाहू |
यातना कुठवरी साहू | विश्वमोहिनी दयाळे ॥३०॥

जीवसृष्टीची जीवन कळा | चिदानंदरूपी चितकळा |
त्रिभुवन सुंदरी वेल्हाळ | भोळा खुळा भाव माझा ॥३१॥

माया ब्रह्मात मानिती भेद | निवडीता तटस्थ झाले वेद |
ज्ञानवंत पै घालिती वाद | खेद बहु वाटतसे ॥३२॥

अंबे तूच रामकृष्ण हरी | राधा रुक्मिणी जनककुमारी |
माया ब्रह्माचा खेळ दशअवतारी | आभेदत्व नसेची ॥३३॥

देहासवे फिरे छाया | तैसी व्यापली श्रीहरीची माया |
ब्रह्म स्वरूपी ओळख द्याया | जगदंबिका समर्थ ॥३४॥

पित्याची ओळख माताच सांगे | बाप म्हणविता वर पांगे |
दूषण येईल निजांगे | समाधान मायकरी ॥३५॥

सगुणसृष्टी सगुणदेव | भावे मानिले स्वयंमेव
भेदाभेद पहाती जीव | सोहं शिवा विसरले ॥३६॥

माजेल वादाचा पाल्हाळ | दुर्गा भगवती गुण वेल्हाळ |
आमंगळासी करिले मंगळ | कृपामृत दृष्टीने ॥३७॥

तुझे रूप ध्यानी मनी | शिरी मुकुट पंचफणी |
केस मोकळे सोडोनी | मान झुकविली उत्तरे ॥३८॥

कुंकुम लाविले स्वस्तीक | हरिद्रा गुलाल बुक्का टिक |
वक्र भुवया सुरेख | धनुष्या कृती शोभती ॥३९॥

शंकरे चंद्रमा धरिला जटेत तोची | तुझिया मुकुटात |
दैत्यावरील क्रोध बहुत | शीतल होण्या धरीला असे ॥४०॥

किंचित मुरडीले नाशिक | नथनी सर्जाची सुरेख |
गालावरी लावली टीक | दृष्ट सगुनीला होईल ॥४१॥

कर्णफुले शोभती छान | तांबुल विडामुखी धरून |
अलंकार गळा भरून | नाभिपर्यंत लोळतसे ॥४२॥

पुतळ्याची हौस भारी | ताईत पेट्या डोरले शृंगारी |
कंठा बोरमाळ गळसरी | महाराणी शोभतसे ॥४३॥

रंगारंगाच्या पैठण्या फार | नारळी जरतारी बुट्टेदार |
छातीवरी उभा पदर | गुर्जरनि माय माझी ॥४४॥

पायघोळ दिसे छान | शिंदेशाही तोडर घालोन |
सच्य चरण उचलोन | वाम पुढे टाकिला ॥४५॥

कमंडलु रुद्राक्ष माला | वामसव्य दोन्ही कराला |
सव्य हास्ती परशु धरीला | वाम लाविला मुकुटासी ॥४६॥

आणिक हस्त चतुर्दश | शस्त्रे धरिले बहुवश |
दृष्टदानव दंडनास | वर्णिता विस्तार वाढेल ॥४७॥

आश्विन शुद्ध कोजागिरी | शृंगार पूजा षोडशोपचारी |
महापूजा रात्रभरी | नामगजरी कल्लोळ ॥४८॥

कोजागिरीचे चंद्रामृत | रम्य वनश्री डोलत |
वैकुंठ कैलास भासत | भाविक भक्ता स्वानंद ॥४९॥

वनस्पती सिद्ध सोज्वळ | धरूजाता होतसे ज्वाळ |
संधीनी संजीवनी कोमल मृतजीवा उठविती ॥५०॥

गळसरीची प्रदक्षिणा | सोपी वाटे बहुजना |
आखतिर्थी प्रदक्षिणा | आष्टतिर्थ दर्शन ॥५१॥

सूर्यतीर्थ कालिका तीर्थ | गंगा लक्ष्मी सरस्वती तीर्थ |
तांबूल यमुना शीतला तीर्थ | स्नाने पापे नासती ॥५२॥

तिसरी महा प्रदक्षिणा | सुरथराजा वैश्यस्थाना |
वणी मार्कंडेया सहजाना | गणती तिन योजने ॥५३॥

कृतयुगी ब्रह्मा सांगे नारदा | सिद्धीदायक भक्त वरदा |
कालिका लक्ष्मी शारदा | जगदंबीका हिच पै ॥५४॥

ममकमंडलु पासून निघाली | गिरीजा तीच गिरणा नाम पावली |
महानदित मुख्य जहाली | पर्वता सन्नीध वहातसे ॥५५॥

ऐसा या अर्धपीठाचा महिमा | नित्य जपावे बत्तीस नामा |
दुर्गभीमा दुर्गाभामा | दुर्गमात्मस्वरूपिणी ॥५६॥

दुर्गा दुर्गार्तिशमनी | दुर्गमा दुर्गपद्वी निवारीनी |
दुर्गमच्छेदिनी | दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी दुर्गभया ॥५७॥

दुर्गतोध्वारिनी दुर्गनिहंत्री | दुर्गमापहा दुर्गमासुर सहंत्री |
कलीयुगी नाममंत्री | उद्धरतिल मानव ॥५८॥

दुर्गमज्ञानदा दुर्गमार्ग स्वरूपिणी | दुर्गभा दुर्गमायुधधारिणी |
दुर्गमालोका दुर्गमार्ग स्वरूपिणी | दुर्गदैत्य लोक दवानला ॥५९॥

दुर्गमार्गप्रदा दुर्गमाश्रीता | दुर्गमविद्या दुर्गमता |
दुर्गमांगी आंबामाता | दुर्गमज्ञान संस्थाना ॥६०॥

दुर्गभया दुर्गमेश्वरी दुर्गभा त्रिभुवना माझारी |
नाम पठणे संकटे निवारी | दुर्गदारिणी भगवती ॥६१॥

नामस्मरणी ठेवुन विश्वास | त्रिकाल जपावे बत्तीस नामास |
निर्विघ्न करील भक्तास | सप्तश्रुंगी निवासिनी ॥६२॥

भक्तिसाधन नामची श्रेष्ठ | नचसाधती जपतपाचे कष्ट |
नाम महिमा वरिष्ठ | कलीयुगा माझारी ॥६३॥

तनमन धनेची शरण | धरावे आंबेची चरण |
त्रिविध ताप दारूण | निवारील निश्चये ॥६४॥

निष्काम करिता भक्ती | आंगीबाने चैतन्य शक्ती |
चौ पुरुषार्थ चारीमुक्ती | वोळंगती सर्वस्वे ॥६५॥

अमृत मोहिनी निवासी | महालयाच्या पंचक्रोसि |
एक योजने दक्षिणेसी | जन्मभूमी कारेगाव ॥६६॥

प्रतिष्ठान निवासी एकनाथ | मासिक वारी पिता करीत |
नाथ कृपेने जन्म होत | देह नाम निवृत्ती ॥६७॥

माता माझी राधाबाई | मुखी नाम आंबाबाई |
बालपणी मंत्र देई | तोची लोलो लागला ॥६८॥

सप्तश्रुंग दुर्गामाई | तुझी लीला तुची वदवी |
भरून उरली सर्वाठाई | मी तव अज्ञान बालक ॥६९॥

श्रोतया विनवी भक्तकवी | चुकी भुली पदरात घ्यावी |
बहुश्रुत अनुभवी | नमन माझे साष्टांग ॥७०॥

इतिश्री पद्म पुराणांतरगत | वर्णिली सह्याद्री खंडात |
मार्कंडेय सप्तशतीत | सविस्तर कथियेले ॥७१॥

तया आधारे वर्णन केले | भक्ती भावे शृंगारीले |
श्रीजगदंबे चरणी वाहिले | भक्ता मुखी वदवावे ॥७२॥

॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी अर्थ:

हे सह्याद्री पर्वतावर वसणाऱ्या सप्तशृंगी मातेला माझे नमस्कार.
हे तीन गुणांनी (सत्त्व, रज, तम) युक्त होऊन संपूर्ण विश्वाला मोहून टाकणाऱ्या जगजननी, तुला माझा नमस्कार.

हे महिषासुराचा वध करणाऱ्या देवी, तुला नमस्कार.
हे देवांना बंधनातून मुक्त करणाऱ्या, भक्तांच्या मनाला आनंद देणाऱ्या आणि दैत्यांचा नाश करणाऱ्या मातेस नमस्कार.

हे आदिशक्ती मुळमाया भगवती, तुझे नाव घेत भक्त गर्जना करतात.
तू सगुण रूपात पार्वतीप्रमाणे सजलेली आहेस, ज्याला देव-मनुष्य शांतपणे पाहतात.

कठीण पर्वत ओलांडून जेव्हा तुझ्या दरवाजापर्यंत पोहोचतो,
तेव्हा सर्व थकवा नाहीसा होतो — हे अद्भुत चमत्कार आहे.

मर्त्यलोकात तुझे सुंदर ध्यान करणारे विवेकी भक्त,
साष्टांग नमस्कार करून डोळे मिटतात आणि तुझे रूप हृदयात स्थापन करतात.

सर्व देवतांचे तेज एकत्र येऊन तुझे अठरा भुजांचे रूप प्रकट झाले,
तू पृथ्वीवर प्रकट होताच दैत्यांचा भय नष्ट झाला.

सर्व देवांची एकच शक्ती म्हणजे तू — तुझी प्रेमाने भक्ती करावी.
ज्याच्या मनात निश्चय आहे, त्याला चारही मुक्ती सहज मिळतात.

भारतातील अर्धपीठांमध्ये सप्तश्रृंगगड हे एक महत्त्वाचे पीठ आहे.
हीच दुर्गा अठरा हातांनी सुसज्ज होऊन भक्तांना मोक्ष देते.

हे ब्राह्मणांच्या कुलदेवता, रेणुका माता रूपाने वसणाऱ्या देवी, तुला नमस्कार।
हे क्षत्रिय कुलाला वर देणारी तुळजापूरची तुकाई माता, तुला वंदन।

वैश्यांची आई म्हणून तू करवीर (कोल्हापूर) येथे रमाबाई रूपाने वसतेस।
शूद्रांसह सर्व चार वर्णांमध्ये सप्तशृंगी दुर्गा कृपाळू आहेस।

पर्वताच्या गुहेत तुझे ध्यान धावत जाते,
आणि तू असुरांवर क्रोधाने विविध शस्त्रे घेऊन रणांगणात उभी असतेस।

कधी तू सौम्य रूपात दिसतेस,
तर कधी तुझ्या डोळ्यांत उग्रता प्रकट होते।
भक्तांना प्रेमाने वेड लावून तू त्यांना आनंदाने नाचवतेस।

तुझ्यासमोर पर्वतीवर मार्कंडेय मुनी सप्तशतीचा मधुर पाठ करतात,
आणि जगदंबा लक्ष देऊन कानाजवळ हात ठेवून ते ऐकते।

घोडंब येथे ध्रुवबाळ स्तुतीसाठी पूर्वेकडे उभा आहे,
आणि पाठीमागे परशुराम उभे असून निसर्गाची सुंदर रचना दिसते।

गणेशतीर्थात लंबोदर (गणेश), यमुना-तांबूल तीर्थ सुंदर आहे,
शिवालयात सिद्धेश्वराचे तीर्थ आहे — येथे स्नान केल्याने पाप नष्ट होतात।

पिंडदान व पितृतर्पण केल्याने पूर्वजांची मुक्ती होते,
आणि ते मणिद्वीपात आनंदाने राहून मुक्तीचा अनुभव घेतात।

नवदुर्गा पर्वताच्या शिखरावर शस्त्रांनी सज्ज आहेत,
त्या गुप्तपणे उभ्या राहून ध्वजाचे रक्षण करतात।

सप्तमातृका विक्राळ रूप धारण करून दीप प्रज्वलित करतात,
आणि आपल्या इच्छेने त्या सप्तश्रुंगाचे रक्षण करतात।

वेताळ, चंडीका, भैरव, शाखिनी, डाकिनी हे सर्व देवीच्या दरबारात आहेत,
आणि अंबिका स्वतः त्यांचे रक्षण करते।

तुझे अनेक अद्भुत चमत्कार आहेत, ते वर्णन करणेही कठीण आहे,
एकच रूप धारण करून तू सर्वत्र प्रकट होतेस — समर्थ भगवती।

राम बालब्रहमचारी असताना पृथ्वीवर तीर्थयात्रा करत फिरले,
आणि तुझ्या सप्तशृंग पर्वतावर दर्शनासाठी आले।

रघुनाथ वनवासात असताना पंचवटी येथे राहिले,
आणि सीतेला सोबत घेऊन तुझ्या दर्शनासाठी येत असत।

आजही सिंदूर लावून तू भक्तांसमोर विराजमान आहेस,
पहिल्याच दर्शनात सगुण रूपात प्रकट होतेस।

ही माझी अनादी माता आहे, जी भक्तांना संसारसागरातून पार करते,
आणि योगींना ब्रह्मानंदाच्या अवस्थेत स्थिर करते।

सप्तशृंग रूपाने सप्तशतीचे शुद्ध उच्चारण करणाऱ्याला,
तुझ्या कृपेने उत्तम गती (मोक्ष) प्राप्त होते।

हे जगन्माते, तू इतकी श्रीमंत असूनही भक्तांना का त्रास देतेस?
अन्न-पाण्यासाठी त्यांना दररोज भटकावे लागते।

तू भक्तांची परीक्षा घेतेस, खरे-खोटे ओळखतेस,
आणि शेवटी खऱ्या भक्ताला ब्रह्मस्वरूप दाखवतेस।

तुझे गुणगान करता करता राधासुत तुझ्यात लीन झाला,
तो जल-स्थल सर्वत्र तुझे ध्यान अहोरात्र करतो।

कधी तू चैतन्यस्वरूप दाखवतेस, भक्ती व जप-तप करताना,
आतल्या मनात तुझ्या कृपेने अखंड ध्यानाचा दीप प्रज्वलित राहतो।

आता तुझा अंत पाहू नको — मी किती वेळ तुझ्याकडे पाहू?
हे विश्वमोहिनी दयाळू माता, मी किती यातना सहन करू?

तू सर्व जीवसृष्टीची जीवनशक्ती आहेस, चिदानंदरूप चेतना आहेस,
तीनही लोकांना सुंदर भासणारी — माझा भाव भोळा, निष्कपट आहे।

माया आणि ब्रह्म यांत भेद मानला जातो, पण वेद शेवटी तटस्थ राहतात,
ज्ञानवान लोक वाद घालतात, पण त्यामुळे खेदच वाटतो।

हे अंबे, तूच राम, कृष्ण, हरी आहेस,
तूच राधा, रुक्मिणी आणि सीता (जनककुमारी) आहेस।
माया आणि ब्रह्माचा हा दशावतारांचा खेळ आहे — यात भेद नाही।

जशी शरीरासोबत सावली असते, तशी श्रीहरीची माया सर्वत्र व्यापलेली आहे,
आणि ब्रह्मस्वरूपाची ओळख करून देण्यासाठी जगदंबा समर्थ आहे।

वडिलांची ओळख आईच करून देते,
बाप म्हणवून घेताना काही दोष येऊ शकतो,
पण आई सर्व दोष दूर करून समाधान देते।

सगुण सृष्टी आणि सगुण देव आपण भावाने स्वीकारतो,
पण जीव भेदाभेदात अडकून “सोऽहं शिव” हे सत्य विसरतो।

वाद वाढत जातो, पण दुर्गा भगवती गुणांनी परिपूर्ण आहे,
ती अमंगलालाही मंगल करते — तिच्या कृपादृष्टीने।

तुझे रूप ध्यानात दिसते — डोक्यावर पंचफणी मुकुट आहे,
केस मोकळे सोडलेले आहेत आणि तू मान झुकवून उभी आहेस।

कुंकू, स्वस्तिक, हळद, गुलाल, बुक्का असा सुंदर श्रृंगार केलेला आहे,
तुझ्या वक्र भुवया धनुष्याप्रमाणे शोभत आहेत।

शंकराच्या जटेत असलेला चंद्र तू मुकुटात धारण केला आहेस,
दैत्यांवरील क्रोध शांत करण्यासाठी तो शीतलपणा देतो।

तुझे नाक किंचित वाकडे असून सुंदर नथ परिधान केलेली आहे,
गालावर लावलेला टिळा दृष्ट लागण्यापासून रक्षण करतो।

कानात सुंदर कर्णफुले आहेत, तोंडात तांबूल आहे,
गळ्यातील अलंकार नाभीपर्यंत झुलत आहेत।

ताईत, पेट्या, डोर असे विविध दागिने घातलेले आहेत,
गळ्यात बोरमाळ असून महाराणीप्रमाणे शोभत आहेस।

रंगीबेरंगी पैठण्या, नारळी जरीचे वस्त्र परिधान केले आहे,
छातीवर पदर सुंदरपणे उभा आहे।

पायघोळ सुंदर दिसतो, शिंदेशाही तोडर घातले आहेत,
उजवा पाय उचलून डावा पुढे टाकलेला आहे।

हातात कमंडलू आणि रुद्राक्ष माळ आहे,
एका हातात परशु आहे आणि दुसरा मुकुटाजवळ आहे।

इतर अनेक हातांत विविध शस्त्रे आहेत,
दैत्यांचा नाश करण्यासाठी ती सज्ज आहेत — वर्णन अधिक विस्तृत होईल।

आश्विन महिन्यातील कोजागिरीला षोडशोपचार पूजा केली जाते,
रात्रभर महापूजा आणि नामस्मरणाचा गजर चालतो।

कोजागिरीचा चंद्र अमृतासारखा वाटतो,
वनराई सुंदर दिसते आणि वैकुंठ-कैलासासारखा आनंद मिळतो।

वनस्पती सिद्ध आणि पवित्र आहेत,
त्या संजीवनीप्रमाणे मृतप्राय जीवांना जीवन देतात।

गळसरीची प्रदक्षिणा सोपी वाटते,
आखतीर्थ प्रदक्षिणेत आठ तीर्थांचे दर्शन होते।

सूर्य, कालिका, गंगा, लक्ष्मी, सरस्वती, यमुना, शीतला अशी तीर्थे आहेत,
येथे स्नान केल्याने पाप नष्ट होतात।

तिसरी महाप्रदक्षिणा सुरथ राजा आणि वैश्याने केली,
ती वणी-मार्कंडेय क्षेत्राभोवती तीन योजनांची आहे।

कृतयुगात ब्रह्मदेवाने नारदाला सांगितले,
की हीच कालिका, लक्ष्मी, सरस्वती — जगदंबा आहे।

माझ्या कमंडलूपासून निघालेली नदी गिरणा नावाने प्रसिद्ध झाली,
ती पर्वताजवळ वाहणारी महानदी बनली।

या अर्धपीठाचा महिमा महान आहे — बत्तीस नावे जपावी,
दुर्गा विविध रूपांनी भक्तांचे रक्षण करते।

दुर्गा संकट निवारण करणारी, मार्ग दाखवणारी,
दुर्गम संकटांचा नाश करणारी आहे।

कलीयुगात या नावांचा जप मंत्रासारखा कार्य करतो,
आणि मानवांना उद्धार करतो।

दुर्गा ज्ञान देणारी, मार्ग दाखवणारी, शस्त्रधारी आहे,
आणि दैत्यांचा नाश करणारी अग्नीसारखी आहे।

दुर्गा मार्गदर्शक, विद्या देणारी आणि संकटातून बाहेर काढणारी आहे,
तीच अंबामाता सर्व ज्ञानाचे केंद्र आहे।

दुर्गा त्रिभुवनातील रक्षण करणारी आहे,
तिचे नामस्मरण केल्याने संकटे दूर होतात।

नामस्मरणावर विश्वास ठेवून दिवसातून तीन वेळा जप करावा,
सप्तशृंगी माता सर्व अडथळे दूर करते।

भक्तीसाठी नामस्मरण सर्वोत्तम आहे,
जप-तपापेक्षा नाममहिमा अधिक श्रेष्ठ आहे।

तन, मन, धन अर्पण करून अंबेच्या चरणी शरण जावे,
ती त्रिविध ताप दूर करते।

निष्काम भक्ती केल्याने चैतन्यशक्ती जागृत होते,
आणि चारही पुरुषार्थ व मुक्ती मिळतात।

अमृतमोहिनी देवी महालयाच्या परिसरात वसते,
दक्षिणेस कारेगाव तिची जन्मभूमी आहे।

एकनाथ महाराज प्रतिष्ठान येथे वसले,
त्यांच्या कृपेने निवृत्तीचे नामप्राप्ती झाले।

माझी माता राधाबाई मला लहानपणी मंत्र दिला,
आणि त्यातून मला भक्ति लागली।

हे सप्तशृंगी दुर्गामाई, तुझी लीला तूच जाणतेस,
मी अज्ञान बालक आहे।

भक्तकवी श्रोत्यांना विनंती करतो — चुका असतील तर क्षमा करावी,
अनुभवी लोकांना साष्टांग नमस्कार।

हे वर्णन पद्मपुराण व सह्याद्रीखंडावर आधारित आहे,
मार्कंडेय सप्तशतीत याचे सविस्तर वर्णन आहे।

या आधारे भक्तिभावाने हे वर्णन केले आहे,
हे सर्व श्रीजगदंबेच्या चरणी अर्पण आहे।

श्रीजगदंबार्पणमस्तु