Ganpati Atharvashirsh
|| श्री गणेशाय नम: ||

स्वस्ति मंत्र

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा:।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।
स्थिरैरंगैस्तुष्टुवाग्‌ सस्तनूभि:।
व्यशेम देवहितं यदायू:॥१॥

ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा:।
स्वस्ति न: पूषा विश्ववेदाः।
स्वस्ति न: तार्क्ष्यो अरिष्टनेमि:।
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥२॥
ॐ शान्ति:। शान्ति:। शान्ति:।।

ॐ नमस्ते गणपतये।

त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि।
त्वमेव केवलं कर्ताऽसि।
त्वमेव केवलं धर्ताऽसि।
त्वमेव केवलं हर्ताऽसि।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि।
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम्।
ऋतं वच्मि। सत्यं वच्मि।
अव त्वं मां। अव वक्तारम्।
अव श्रोतारम्। अव दातारम्।
अव धातारम्। अवानूचानमव शिष्यम्।
अव पश्चातात्। अव पुरस्तात्।
अवोत्तरात्तात्। अव दक्षिणात्तात्।
अव चोर्ध्वात्तात्। अवाधरात्तात्।
सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्॥३॥

त्वं वाङ्‌मयस्त्वं चिन्मय:।
त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥४॥

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते।
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति।
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:।
त्वं चत्वारिवाक्पदानि॥५॥

त्वं गुणत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:।
त्वं देहत्रयातीत: त्वं कालत्रयातीत:।
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्।
त्वं शक्तित्रयात्मक:।
त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं।
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम्॥६॥

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम्।
अनुस्वार: परतर:। अर्धेन्दुलसितम्।
तारेण ऋद्धम्। एतत्तव मनुस्वरूपम्।
गकार: पूर्वरूपम्। अकारो मध्यरूपम्।
अनुस्वारश्चान्त्यरूपम्। बिन्दुरूत्तररूपम्।
नाद: संधानम्। संहिता संधि: सैषा गणेशविद्या।
गणक ऋषि:। निचृद्गायत्रीछन्द:। गणपतिर्देवता।
ॐ गं गणपतये नम:॥७॥

एकदन्ताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नो दन्ती प्रचोदयात्॥८॥

एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणम्।
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्।
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।
रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पै: सुपूजितम्॥९॥

भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम्।
आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते: पुरुषात्परम्।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर:॥१०॥

नमो व्रातपतये। नमो गणपतये।
नम: प्रथमपतये। नमस्तेऽस्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने।
शिवसुताय वरदमूर्तये नमो नम:॥११॥

एतदथर्वशीर्षं योऽधीते। स ब्रह्मभूयाय कल्पते।
स सर्वविघ्नैर्न बाध्यते। स सर्वत: सुखमेधते।
स पञ्चमहापापात्प्रमुच्यते॥१२॥

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति।
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति।
सायं प्रात: प्रयुञ्जानो पापोऽपविघ्नो भवति।
सर्वत्राधीयानोऽविघ्नो भवति।
धर्मार्थकाममोक्षं च विन्दति॥१३॥

इदमथर्वशीर्षं अशिष्याय न देयम्।
यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति।
सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्॥१४॥

अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति।
चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति।
इत्यथर्वणवाक्यम्। ब्रह्माद्यावरणं विद्यात्।
न विभेति कदाचनेति॥१५॥

यो दूर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति।
यो लाजैर्यजति स यशोवान् भवति। स मेधावान् भवति।
यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति।
य: साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते॥१६॥

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति।
सूर्यगृहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वा जपत्वा सिद्धमन्त्रो भवति।
महाविघ्नात्प्रमुच्यते। महादोषात्प्रमुच्यते। महापापात्प्रमुच्यते।
स सर्ववित् भवति स सर्ववित् भवति। य एवं वेद। इत्युपनिषद्॥१७॥

शांती मंत्र

ॐ सह नाववतु।
सह नौ भुनक्तु।
सह वीर्यं करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै।
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:॥

इति श्रीगणपति-अथर्वशीर्षं सम्पूर्णम्।

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी अर्थ:

अथर्वशीर्ष हे अथर्ववेदातील एक उपनिषद आहे आणि ते गणक ऋषींनी लिहिले आहे.

स्वस्ति मंत्रात आपण देवांना विनंती करतो की, आमच्या इंद्रियांना (कान, डोळे) शुभ गोष्टी ऐकू आणि पाहू दे, आमचे शरीर आणि अंग स्थिर आणि निरोगी ठेव, जेणेकरून आम्ही आपले आयुष्य देवांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या हितासाठी व्यतीत करू शकू.

त्यात पुढे आपण अशी प्रार्थना करतो कि इन्द्र, पूषा (सूर्य), तार्क्ष्य(रक्षणकर्ता गरुड - विष्णूचे वाहन ) , बृहस्पती देवगुरू या देवतांचा आशीर्वाद आपल्यावर असो. त्यांचे संरक्षण आपल्याला लाभो आणि त्यांची कृपा आपल्यावर असो.

गणपतीला नमस्कार करून पुढे आपण म्हणतो

"हे गणेशा, तूच प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तूच एकटा सर्व विश्वाचा कर्ता, पालनकर्ता आणि संहारक आहेस. तूच सर्व विश्वाचा एकात्म ब्रह्म आहेस. तूच साक्षात आत्मा आहेस. मी सत्य बोलतो आणि तुझी प्रार्थना करतो. तू माझे रक्षण कर. वक्त्याचे रक्षण कर. श्रोत्याचे रक्षण कर. दात्याचे रक्षण कर. धारण करणाऱ्याचे रक्षण कर. शिक्षकाचे रक्षण कर. शिष्याचे रक्षण कर. माझ्या मागच्या दिशेने, समोरच्या दिशेने, उत्तर दिशेने, दक्षिण दिशेने, वरच्या दिशेने, खालच्या दिशेने रक्षण कर. सर्व बाजूंनी माझे रक्षण कर, सर्व बाजूंनी माझे रक्षण कर.

तूच शब्द, ज्ञान, आनंद, आणि ब्रह्म यांचे स्वरूप आहेस. तूच प्रत्यक्ष ब्रह्म आहेस आणि ज्ञान आणि विज्ञानाने परिपूर्ण आहेस.

सर्व विश्व तुझ्यातून उत्पन्न होते, तुझ्यात स्थिर राहते, तुझ्यात विलीन होते आणि तुझ्यातून परत येते. तूच पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश आहेस.

सत्त्व, रज, आणि तम हे तीन गुण आहेत. तू या सर्व गुणांच्या पलीकडे असलेला, म्हणजेच या गुणांनी ज्याच्यावर परिणाम होत नाही, असा आहेस. जागरण, स्वप्न, आणि सुषुप्ती या तीन अवस्था आहेत. तू या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असलेला आहेस. स्थूल (भौतिक शरीर), सूक्ष्म (मनोबुद्धीचे शरीर), आणि कारण (आध्यात्मिक शरीर) या तीन प्रकारच्या शरीरांमध्ये तू कोणत्याही शरीराच्या मर्यादेत नसलेला आहेस. भूतकाळ, वर्तमानकाळ, आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांच्या पलीकडे तू असतोस, म्हणजेच काळाच्या बंधनात तू कधीच अडकलेला नाहीस.
तू सदैव मूलाधार चक्रात स्थिर आहेस. तू तीन शक्तींनी (इच्छा, क्रिया, ज्ञान) बनलेला आहेस. योगी नेहमीच तुझं ध्यान करतात. तूच ब्रह्मा आहेस, तूच विष्णू आहेस, तूच रुद्र आहेस, तूच इंद्र आहेस, तूच अग्नि आहेस. तूच वायू आहेस, तूच सूर्य आहेस, तूच चंद्र आहेस. तूच सर्व जगाच्या पाठीशी असणारा ब्रह्म आहेस."

गणेशाचे ध्यान करताना "ग" अक्षर पहिल्यांदा उच्चारावे, त्यानंतर "अ" अक्षर, आणि त्यानंतर अनुस्वार (ं) उच्चारावा.
"अर्धचंद्राकृती" म्हणजे अर्धचंद्र स्वरूपाचा ध्वनीसुद्धा उच्चारावा.
त्या उच्चाराने गणेशाची आराधना केली जाते.
गकार हे गणेशाचे प्रारंभिक रूप आहे, अकार हे मध्यम रूप आहे, अनुस्वार हे अंतिम रूप आहे, बिंदू हे त्याचे सर्वोच्च रूप आहे.
नाद म्हणजे ध्वनीसंदेश आणि संहिता म्हणजे एकत्रित साधना, हे सर्व मिळून गणेशविद्या बनते.
गणक हा ऋषी आहे, निचृद्गायत्री हे छंद आहे, गणपति ही देवता आहे.
ॐ गं गणपतये नमः - या मंत्राने गणेशाची आराधना केली जाते.

एकदंत, चतुर्भुज असलेल्या गणेशाचे आपण ध्यान करतो. ज्याच्या हातात पाश आणि अंकुश आहेत, तसेच मोदक आणि वरद (आशिष) देणारी मुद्रा आहे. त्याच्या ध्वजावर मूषक आहे. तो रक्तवर्णाचा आहे, लांब पोट असलेला आहे, शूर्पासारखी मोठी कान असलेला आहे, आणि लाल वस्त्र परिधान केलेला आहे. त्याचे शरीर लाल चंदनाने सुवासित केलेले आहे आणि तो लाल फुलांनी पूजला जातो.

गणेश जगाचा निर्माता आहे आणि सृष्टीच्या अगोदरच अस्तित्वात असलेला सर्वोच्च पुरुष आहे. जो व्यक्ती नियमितपणे गणेशाचे ध्यान करतो, तो इतर सर्व योगींमध्ये श्रेष्ठ योगी होतो.

आपण त्याचे व्रातपतिनामक (व्रात याचा अर्थ समूह पती म्हणजे प्रमुख ) गणपतिनामक, प्रथमगणेश, लम्बोदर, एकदन्त, विघ्ननाशक, शिवसुत आणि वरदायक मूर्ती म्हणून स्तुती करत नमस्कार करतो

या अथर्वशीर्षाचे पठण करणार्‍याला ब्रह्मा समान मानले जाते, त्याला जीवनातील सर्व विघ्नांपासून मुक्ती मिळते. सर्वत्र सुख प्राप्त होते आणि पञ्चमहापापांपासून मुक्ती मिळते.

संध्याकाळी या स्तोत्राचे पठण करणारा व्यक्ती दिवसभर केलेल्या पापांपासून मुक्त होतो. सकाळी पठण करणारा व्यक्ती रात्री केलेल्या पापांपासून मुक्त होतो. जो व्यक्ती या स्तोत्राचे सकाळ-संध्याकाळ नियमित पठण करतो, त्याचे पाप आणि विघ्न नाहीसे होतात. जो व्यक्ती सर्वत्र या स्तोत्राचे पाठ करतो, त्यावर कोणतेही विघ्न येत नाही. त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांचा लाभ होतो.

हे अथर्वशीर्ष गुरु (शिष्य नाही अशिष्य) अशा व्यक्तीला देऊ नये. जो मोहापोटी हे (अथर्वशीर्ष) अशिष्याला देतो, तो पापी होतो. या अथर्वशीर्षाचा सहस्र वेळा पाठ केल्याने जे जे मनोकामना साधण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ते सर्व त्याला प्राप्त होते.

या (अथर्वशीर्ष) स्तोत्राने गणपतीचे अभिषेक (पूजन) करणारा व्यक्ति वाग्मी (अर्थात प्रभावी वक्ता) बनतो. चतुर्थीच्या दिवशी उपवास करून हे स्तोत्र जपल्याने तो विद्यावान (विद्या प्राप्त करणारा) होतो. हे अथर्ववेदातील वचन आहे. हे स्तोत्र ब्रह्मादि (ब्रह्मदेवाच्या) कवचासारखे आहे, जे आपल्याला संरक्षित करते. त्यामुळे तो व्यक्ति कधीच घाबरत नाही.

जो दूर्वा (दर्भ घास) वापरून गणपतीची पूजा करतो, तो कुबेरासारखा संपन्न होतो. जो लाह्या (तांदुळाचे लाह्या) वापरून गणपतीची पूजा करतो, तो यशस्वी होतो आणि बुद्धिमान बनतो. जो मोदकाच्या हजार नैवेद्याने गणपतीची पूजा करतो, तो इच्छित फळ (मनोकामना) प्राप्त करतो. जो आहुती देताना साजूक तूप आणि समिधा (हवन सामग्री) वापरून गणपतीची पूजा करतो, तो सर्व काही प्राप्त करतो, सर्व काही प्राप्त करतो.

आठ ब्राह्मणांना योग्य प्रकारे दक्षिणा देऊन हे अथर्वशीर्ष पठण केल्याने तो सूर्यसमान तेजस्वी होतो. सूर्याच्या मंदिरात, महानदीच्या काठी किंवा प्रतिमेसमोर हा जप केल्यास तो मंत्र सिद्ध होतो (फळ देणारा होतो). हा मंत्र जपल्याने महान विघ्नांपासून, दोषांपासून आणि पापांपासून मुक्ती मिळते. जो हा उपदेश जाणतो, तो सर्वज्ञ होतो, सर्व ज्ञानी होतो. हे उपनिषदाचे वचन आहे.

आपण वर वाचले कि अथर्वशीर्ष हे अथर्ववेदातील एक उपनिषद आहे . उपनिषद म्हणजे वेदांचा "अंत" किंवा "शेवटचा" भाग मानला जातो. उपनिषद हा संस्कृत शब्द आहे, जो दोन शब्दांपासून तयार झाला आहे: "उप" म्हणजे जवळ, "नि" म्हणजे खाली, आणि "सद्" म्हणजे बसणे किंवा ठिकाण. याचा शब्दशः अर्थ "गुरूच्या जवळ बसणे" असा होतो. याचा मुख्यतः अर्थ असा आहे की गुरूच्या जवळ बसून ज्ञान प्राप्त करणे, विशेषतः आध्यात्मिक ज्ञान. आता वेदातील ज्ञान शिकताना कोणीतरी गुरु आणि कोणी तरी शिष्य असतोच. त्यावेळी गुरुचे ज्ञान देताना आणि शिष्यांचे ज्ञान घेताना मन, शरीर, आणि आत्मा स्थिर असणे आवश्यक आहे म्हणून शेवटी शांती मंत्र म्हणायचं असतो. त्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे.

या शांती मंत्रात गुरु-शिष्य यांच्यातील एकत्रित शिक्षणाचे महत्त्व वर्णन केले आहे. या मंत्रात गुरु आणि शिष्य यांच्या एकत्रित अध्यापनासाठी प्रार्थना केली आहे, ज्यामध्ये एकमेकांविषयी प्रेम आणि आदर ठेवून विद्या ग्रहण करण्याची भावना व्यक्त केली आहे. "शांती" या शब्दाचा तीन वेळा उच्चार करून, मन, शरीर, आणि आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते.

अशा प्रकारे श्री गणपति अथर्वशीर्ष पूर्ण झाले.