Healing Mantra
उपचार मंत्र/ Healing Mantra

वैदिक मंत्रांचा आरोग्यावर परिणाम होतो. उदा. विशिष्ट लहरींमुळे मनावरील ताण कमी होतो, लयबद्ध जप केल्याने मज्जासंस्था शांत होते. नामजप केल्याने मेंदूची क्रिया उच्च-फ्रिक्वेन्सी बीटा लहरींपासून (व्यस्त मन) शांत करणाऱ्या अल्फा(८ ते १४ हर्ट्झ) आणि थीटा (४ ते ८ हर्ट्झ) लहरींकडे (विश्रांती, ध्यान) वळते. मंत्र मेंदूच्या भीती केंद्रातील अमिगडाला (मेंदूचा एक भाग जो भीती चिंता आक्रमकता यांचे संसाधन करतो) मधील क्रियाकलाप कमी करते,त्यामुळे भावनिक स्थिरता वाढते. नामजप करताना लयबद्ध श्वास घेतल्याने पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था (विश्रांती आणि पचन) सक्रिय होते, ज्यामुळे ताणाच्या प्रतिक्रियेचा प्रतिकार होतो. मंत्र व्हॅगस नर्व्ह ना उत्तेजित करतात त्यामुळे हृदय,रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन आरोग्यास आधार मिळतो.मंत्राचा सराव मेंदूच्या डाव्या आणि उजव्या गोलार्धांना (left & right brain) संतुलित करण्यास मदत करतो, जागरूकता वाढवतो. म्हणून इतर उपचारासोबत मंत्रोपचार आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. वेगवेगळ्या व्याधींसाठी वेगवेगळे मंत्र आहेत. प्रमुख उपचार मंत्रामध्ये महामृत्युंजय मंत्र तर आहेच पण आपण इतरही मंत्र पाहू.

---------------------
धन्वंतरी मंत्र (आरोग्यदेवता)
---------------------

ॐ नमो भगवते वासुदेवाय
धन्वन्तरये अमृतकलशहस्ताय
सर्वामयविनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्रीमहाविष्णवे नमः ॥

हे भगवान वासुदेव, जे धन्वंतरी रूपाने अवतरलेले आहात,ज्यांच्या हातात अमृताचा कलश आहे,जे सर्व प्रकारचे रोग नष्ट करणारेआणि तीनही लोकांचे स्वामी आहात —
अशा श्रीमहाविष्णूंना माझा नमस्कार असो.तुमच्या कृपेने मला पूर्ण आरोग्य, बल व दीर्घायुष्य प्राप्त होवो.

---------------------
देवीचा सर्वव्याधीशमन मंत्र
---------------------

सर्वाबाधाविनिर्मुक्तो धनधान्यसुतान्वितः ।
मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः ॥

देवीच्या कृपेने मनुष्य सर्व बाधा, आजार व संकटांपासून मुक्त होतो आणि धन-धान्य व सुख प्राप्त करतो.

---------------------
वेदांतील आरोग्य व शांती मंत्र
---------------------

ॐ शं नो मित्रः शं वरुणः ।
शं नो भवत्वर्यमा ।
शं न इन्द्रो बृहस्पतिः ।
शं नो विष्णुरुरुक्रमः ॥

मित्रदेव आम्हाला शांती व कल्याण देवो. वरुणदेव आम्हाला शांती व आरोग्य देवो. आर्यमा आम्हाला सुख व समाधान देवो. इंद्र आणि बृहस्पती आम्हाला बल, बुद्धी व मंगलता देवोत. तीन पावलांत विश्व व्यापणारा
महाविष्णु आम्हाला पूर्ण शांती व संरक्षण देवो.
----------------------------
देवता काय दर्शवते
----------------------------
मित्र मैत्री, सत्य, सद्भाव
वरुण नियम, शिस्त, नैतिकता
आर्यमा समाज, कुटुंब, धर्म
इंद्र बल, संरक्षण
बृहस्पती ज्ञान, बुद्धी
विष्णु पालन, स्थैर्य
----------------------------