आपल्या घरात देवघर असतेच. तसेच काही पितळेच्या किंवा चांदीच्या देवतांच्या मूर्ती असतात. एखाद्या सत्पुरुषाचा (स्वामी समर्थ, गजानन महाराज किंवा इतर एखाद्या गुरूचा) फोटो किंवा मूर्ती असते. अशावेळी मांडणी कशी करावी हा एक प्रश्न असतो. याकरिता हा प्रपंच.
मी खाली मांडणी देत आहे.
आपल्या देवघरात अनेक देवतांचे पवित्र स्वरूप आहे. शास्त्रोक्त मांडणी करताना मुख्य तत्त्वे अशी असतात –
• देवतांचे मुख पूर्व किंवा पश्चिमेकडे असावे (आपण पूजेस बसताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे).
• एकाच देवतेच्या अनेक मूर्ती जास्त ठेवू नयेत. तुटलेल्या मूर्ती ठेवू नयेत. देवांच्या समोर आरसा नसावा.
• देवघरात काळे कपडे टाळावेत; लाल/पिवळे वस्त्र पाटावर अंथरावे.
• कुलदेवता, कुलदेवतेचा टाक आणि मुख्य उपास्य देवता मध्यभागी असावी.
• देवीप्रधान घर असल्यास कुलदेवता मध्यभागी असणे श्रेष्ठ.
• गणेश (नेहमी थोडा पुढे व स्पष्ट दिसेल असा) साधारण पणे मध्यभागी, चांदीचे लक्ष्मी-गणेश नाणे (गणेशाच्या जवळ डावीकडे)
• शिवलिंग (शिवपिंड) आपल्या डावीकडे शक्यतो स्वतंत्र पाटावर पिंडीसमोर नंदी असल्यास उत्तम
• मध्याच्या डावीकडे – अन्नपूर्णा देवी
• मध्याच्या उजवीकडे - विठ्ठल – रखुमाई (जोडीने), श्रीकृष्ण, लक्ष्मी देवी
• शाळीग्राम श्रीविष्णू स्वरूप असल्याने कृष्ण/विठ्ठलजवळ ठेवावा स्वतंत्र चांदी/तांब्याच्या डबीत किंवा तबकात
• शंख श्रीविष्णू तत्त्वाशी निगडित आहे. म्हणून श्रीकृष्णासमोर
• कपिला गाय ही धर्म, समृद्धी आणि श्रीकृष्णभक्तीचे प्रतीक आहे म्हणून थोडी पुढे, जणू कृष्णाच्या चरणाशी उभी आहे अशा भावनेने ठेवावी
• ताम्रपटावरील श्रीयंत्र (उभे ठेवावे, शक्यतो लाल वस्त्रावर)
• कासव – श्रीयंत्रासमोर
• कलश – ईशान्य कोपऱ्यात (पाणी, आंब्याची पाने, नारळ असल्यास उत्तम)
• कुलदेवतेचा फोटो देवघरात असल्यास शक्यतो मागे स्पष्ट दिसेल असा
• एखाद्या गुरूंचा (स्वामी समर्थ, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज किंवा तत्सम पूज्य संतांचा फोटो असल्यास आपली उजवीकडे मुख्य पाटाच्या बाजूला खाली.
• समई देवतांच्या समोर, पण थोडी पुढे असावी. ती देवांच्या अगदी मध्ये अडथळा होईल अशी नसावी. ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून असावी. समई आपल्या उजव्या बाजूस पुढे ठेवणे उत्तम. कारण उजवी बाजू "पुण्य, मंगल" मानली जाते.