Temple Worship
देवालय / देऊळ /मंदिर आचरण

देवळात जाण्यापूर्वी कळसाला नमस्कार करायचा असतो.

देवळात प्रवेश करताना स्वच्छ आणि शरीर झाकणारे कपडे असावेत किंवा स्थानिक रीतीप्रमाणे वेशभूषा असावी डोक्यावर वस्त्र किंवा पदर असावा. सोय असल्यास हात पाय स्वच्छ धुवावेत. प्रवेशद्वाराजवळ स्थापित देवतेला दुरून नमस्कर करावा. प्रवेश करताना दाराला नमस्कार करून, पायऱ्या चढताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात आज्ञाचक्रावर ठेवावा.

घंटा असल्यास घंटानाद करावा व त्या स्वरलहरी शांत चित्ताने ग्रहण कराव्यात.घंटानादाने वातावरण शुद्ध होते, मन एकाग्र होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि ईश्वराच्या सानिध्याची जाणीव होते.

बहुतांशी मंदिरात नंदी किंवा कासव हे मूर्तीसमोर असते. नंदी हा निष्ठावान सेवक आहे तर कासव हे कूर्मावताराचे प्रतीक आहे. जसे कासव आपल्या पिलांना वात्सल्य दृष्टीने पाहते तसेच देवाने आपल्यावर वात्सल्य दृष्ठी ठेवावी असे सूचित आहे कासव जमिनीवर आणि पाण्यावर राहते तसेच आपण पण प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत राहायची तयारी दर्शविली तर दैवी सानिध्याने दीर्घायुष्य लाभेल. कासव ज्या प्रमाणे आपले अवयव कवचाच्या आत ओढून स्वरक्षण करते तसेच आपण देवासमोर जाताना आपले विकार आवरून दर्शन घ्यावे म्हणजे दैवी आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून प्रवेशानंतर नंदी किंवा कासव ह्यांना नमस्कार करून मग दर्शन घ्यावे.बऱ्याच ठिकाणी गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर गणेश किंवा कीर्तिमुख असेल तर त्यांना नमस्कार करून मग प्रवेश करावा.

देवाचे दर्शन घेताना देव मूर्ती आणि कासव अथवा नंदी ह्यांच्या मध्ये उभे राहू नये. देवतेच्या चरणाकडून दृष्टी हळुवार पणे डोळ्याकडे न्यावी आणि देवतेचे रूप डोळ्यात साठवत प्रार्थना करावी. जर काही अर्पण करायचे असेल तर देवतेच्या पायापाशी ठेवावे अथवा समोर ठेवलेल्या तबकात अथवा ताटात ठेवावे.

प्रदक्षिणा घालताना देवतेची मूर्ती उजव्या बाजूस असावे म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे घालावी. प्रत्येक प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करून पुढील प्रदक्षिणेला सुरुवात करावी. प्रदक्षिणा घालताना गाभाऱ्याला स्पर्श करू नये. देवतेच्या पाठीमागे थांबून नमस्कार करता येईल. गणपतीला 3 प्रदक्षिणा घालाव्यात, हनुमानाला 3, देवींना १,३,५,७ (विषम), महादेवाला अर्धी , भगवान विष्णूंना ३, सूर्यदेवास ७ प्रदक्षिणा घालाव्यात.प्रदक्षिणा घालताना देवाला विनंती करावी कि प्रत्येक पावलागणीत माझी मागील जन्मातील (पुर्वाश्रमातील) पापकर्मे नष्ट होऊ देत आणि तुझी कृपाछाया मला लाभू देत.

तीर्थ हाताच्या मध्यावर घेऊन पिल्यानंतर मधले आणि अनामिका तीर्थ घेतलेल्या तळव्याला लावून दोन्ही डोळ्यांना लावावे आणि हात मस्तकावरून फिरवावा. प्रसाद घेताना थोडे नतमस्तक व्हावे. प्रसाद ग्रहण केल्यानंतर नमस्कार करावा. त्यानंतर लगेच मागे फिरून म्हणजे देवाकडे पाठ करून चालू नये. देवाकडे चेहरा ठेवून काही पावले मागे या आणि जिथे आसन व्यवस्था असेल तेथे किंवा स्वच्छ जागेवर बसून देवाचे नामस्मरण करावे. देवळात शक्यतो आपसात बोलणे टाळाच आवश्यक असल्यास मोजकेच बोला. अकारण शांतता भंग करून भक्तीत व्यत्यय आणणे योग्य नाही.

त्यानंतर निघताना पुन्हा एकदा देवाला नमस्कार करून बाहेर पडा आणि पुन्हा एकदा कळसाला नमस्कार करून मार्गस्थ व्हा.